अनिल वीर सातारा :
सर्वच लेखक आपल्या आवडीच्या साहित्य प्रकारांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अशा साहित्य विषयक व्यासपीठावर लेखकाने एखादी भूमिका घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ.देवानंद सोनटक्के यांनी केले. आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. आश्विनी धोंगडे यांच्या नोबेल साहित्य दर्शन आणि थोडे जनातले थोडे मनातले या दोन ग्रंथांचे प्रकाशन प्रा. देवचंद सोनटक्के व इतर मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाले.तेव्हा ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते.
प्रा डॉ देवानंद सोनटक्के म्हणाले,लेखकाने आपल्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होताना सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.डॉ. अश्विनी धोंगडे यांनी नोबेल साहित्य दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून पुरस्कार मिळालेल्या आणि कोणतीतरी विशिष्ट भूमिका घेतलेल्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. ही अभिनंदनीय गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ लेखिका व कवयित्री आश्लेषा महाजन यांनी डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या थोडे जनातले थोडे मनातले या पुस्तकाचा परिचय करून दिला. आणि लेखिकेने या पुस्तकाच्या निमित्ताने विविध सामाजिक मुद्द्यांना आणि विषयांना स्पर्श केल्याचे स्पष्ट केले.
यावेळी लेखिका व पर्यावरण तज्ञ ऍड. सीमंतिनी नुलकर यांनी डॉ.अश्विनी धोंगडे यांच्या नोबेल साहित्य दर्शन या पुस्तकाचा परिचय करून दिला या पुस्तकाच्या निमित्तानेसुद्धा लेखिकेने आपली स्त्री वादाची भूमिका कायम ठेवली असल्याचे स्पष्ट केले. दिलीप राज प्रकाशनाने प्रकाशन केलेल्या मधुर बर्वे यांनी पुस्तकांमागील आपली भूमिका स्पष्ट केली.
लेखिका अश्विनी धोंगडे यांनी ही दोन्ही पुस्तके लिहिण्यामागच्या प्रेरणा स्पष्ट केल्या. नोबेल पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांची माहिती मराठी वाचकांना व्हावी. या उद्देशाने या पुस्तकाचे लिखाण केल्याचे त्यांनी सांगितले. थोडे जनातले थोडे मनातले हे एक प्रकारचे स्वगत लिखाण असून आसपास घडणाऱ्या विविध घटनांवरील ते भाष्य आहे. असेही त्यांनी सांगितले.हे पुस्तकाचे लिखाण करत असताना माझी मूळ स्त्रीवादी भूमिका मी कायम ठेवली आहे. असेही त्यांनी अधोरेखित केले. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ.संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे शिरिष चिटणीस यांनी केले. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी आभार मानले.