लेझर’चा वापर; साताऱ्यात तीन मंडळांवर गुन्हा

0

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान तसेच मंडळासमोरील सजावटीदरम्यान लेझर बीम लाइट वापरण्यास असणाऱया मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आरोग्यावर तसेच लेझर बीम लाइटचा डोळ्यावर दुष्परिणाम होत असल्याने गणेशोत्सवात याच्या वापरावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बंदी घातली आहे. यानंतरही अनेक मंडळांकडून लेझर बीम लाइटचा वापर सुरू होता. यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक विविध ठिकाणी फिरत होते.

यापैकी एका पथकास रविवार पेठेतील लोणार गल्लीत असणाऱया श्रीनाथ गणेशोत्सव मंडळासमोर लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे दिसले. याची तक्रार हवालदार सागर निकम यांनी नोंदवली आहे. यानुसार ओंकार संजय कवठेकर (रा. रविवार पेठ) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दुसऱ्या गस्ती पथकास सदर बझारमधील नवीन म्हाडा कॉलनीतील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातही लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे आढळले. यानुसार कैलास सिद्धय्या भंडारे (रा. जरंडेश्वर नाका) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार हवालदार गणेश जाधव यांनी नोंदवली आहे.

तिसऱ्या पथकाने पिरवाडी येथील यमुनानगरमधील एका मंडळात लेझर बीम लाइटच्या वापरप्रकरणी संतोष लक्ष्मण निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याची तक्रार हवालदार धीरज मोरे यांनी नोंदवली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here