मायणी दि. ३० (प्रतिनिधी) : वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी ते १५ जानेवारी हा वाचन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल प्रा. मनोज डोंगरदिवे, साहित्यिक प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास बोदगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वाचन पंधरवड्यात दि. १ जानेवारी, २०२५ रोजी ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. दि. २ जानेवारी रोजी कादंबरीकार बाळासाहेब कांबळे यांचे ‘माझे लेखन’ या विषयावर व्याख्यान, दि. ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व सामूहिक पुस्तक वाचन, तर दि. १५ जानेवारी रोजी पुस्तक परीक्षण लेखन स्पर्धा व ग्रंथ आस्वाद कथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात केला जाणार आहे, अशी माहिती समन्वयक प्रा. मनोज डोंगरदिवे यांनी दिली.