पुसेगाव / प्रतिनिधी
खटाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यास आळा घालावा अशी मागणी पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या झालेल्या खरीप हंगामाच्या उत्पादित झालेले सोयाबीन शेतकरी वर्ग व्यापाऱ्यास विक्री करीत आहे. सरकारी धोरणानुसार बाजार समितीचा परवाना घेऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे. असे असताना देखील तालुक्यातील विविध ठिकाणी आठवडे बाजारात बेकायदा सोयाबीन खरेदी सुरू आहे. यामध्ये वजन काट्यात व अन्य प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.सदर प्रकारास वेळीच पायबंद घालणे आवश्यक व गरजेचे आहे.
अगोदरच शेतकरी वर्ग शेती उत्पादनामध्ये व त्याच्या दरामध्ये मेटाकुटीला आला आहे. व त्यातच अशा विनापरवाना व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याने, दरामध्ये,वजनामध्ये मोठी तफावत होत असल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत. यास अनुसरून शेतकऱ्यांशी होत असलेले नुकसान टाळण्यासाठी पुसेगाव येथील श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती खटाव(वडूज ) यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश उर्फ अभिजीत जाधव, श्री सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त सचिन देशमुख, श्री सेवागिरी रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव, माजी सरपंच विजय मसणे, व प्रतीक जाधव यांच्या सह्या आहेत.