वेळू परिसरात चार मोरांची शिकार करणारा वन विभागाच्या ताब्यात

0

कोरेगाव : – येथे चार मोरांची शिकार करून वाहतूक करणाऱ्या कर्मा परशा काळे (रा. बोरगाव) याला वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून मोर मारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
वन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी मंगळवारी सायंकाळी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. वेळू गावच्या हद्दीत दि. १२ मे रोजी चार मोरांची शिकार केली जात असल्याची माहिती घार्गे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ वनपाल व वनरक्षक यांना कारवाईचे आदेश दिले. वन विभागाच्या पथकाने तात्काळ वेळू गावाकडे धाव घेतली.

कर्मा परशा काळे मोरांची शिकार करून मृतावस्थेतील मोर घेऊन जात असताना वन विभागाला सापडला. वन विभागाने वन अधिनियमाप्रमाणे त्याला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबरच त्याच्या ताब्यातून सापळा साहित्य, फासगे व दोन दुचाकी जप्त केल्या. कोरेगावच्या वन विभागाने केलेल्या कारवाईबद्दल जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक रेशमा व्होरकाटे यांनी अभिनंदन केले.

शिकारीविरोधात वन विभागाची मोहीम
राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोर यांसारख्या वन्य जीवांच्या शिकार करणाऱ्यांच्या विरोधात कोरेगावच्या वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. वनक्षेत्रासह वन्यजीवांची कोठे शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाला द्यावी.

माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. माहितीच्या आधारे कडक कारवाई केली जाईल, असे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी सांगितले. एकूणच वन विभागाने कोरेगाव तालुक्यात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here