साताऱ्यात एक दिवसीय जिल्हास्तरीय ॲट्रॉसिटीविषयक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0

सातारा दि.25:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व सुधारित नियम २०१६ चे प्रभावी अंमलबजावणी व्हावे म्हणून कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पोलीस करमणूक केंद्र हॉल, सातारा येथे 24 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

             यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न अतिरिक्त पोलीस अधिक्षक कमलेश मीना, जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा सरकारी अभियोक्ता महेश कुलकर्णी,  सातारा  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे  उपायुक्त स्वाती इथापे, बार्टीचे उपायुक्त तथा विभाग प्रमुख अनिल कारंडे, व्याख्याते सुभाष केकाण, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

       कार्यशाळेत सत्रात प्रमुख व्याख्याते सुभाष केकन यांनी ॲक्ट्रोसिटी कायद्याची सविस्तर माहिती सांगितली.   सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव सहा., सहायक जिल्हा सरकारी वकील  लक्ष्मण खाडे, एस. के. माने, विशेष सरकारी वकील अमोल सोनावणे यांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकून न्यायालयीन प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

          उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव गणेश किंद्रे यांनी पोलीस विभागाचे वतीने मनोगत व्यक्त केले. तदनंतर सहायक आयुक्त, नितीन उबाळे यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे महत्व आणि कौटुंबिक पुनर्वसन तसेच सहायक, आयुक्त समाज कल्याण, सातारा कार्यालयाने, केलेल्या विशेष कामाची माहिती कार्यशाळेच्या निमित्ताने विशद केली.

           कार्यशाळेस उपस्थित अशासकीय सदस्य गायकवाड व सोनवणे यांनी या कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे असून, उपविभागीय स्तरावर कार्यशाळा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत बार्टी कार्यालयाचे आभार मानले. या प्रसंगी विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

           कार्यशाळेची सांगता मार्गदर्शन करतांना नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक यांनी बार्टी कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती देत असताना, बार्टी चे महासंचालक सुनील वारे यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार पुढे तालुका पातळीवर उपविभाग स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत . त्या करिता विविध संवर्ग यांचेही निवासी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येईल असे मुद्देसुद मांडणी करीत यावेळी उपस्थितीतांचे आभार मानले.

                  कार्यशाळेचे प्रास्ताविक अनिल कारंडे, उप जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी यांनी केले. सूत्र संचालन सौरभ बाचल व विशाल कांबळे तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी समाज कल्याण विभाग अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक श्री. संदिप मोरे, श्रीम. मनिषा सावंत, श्री. दिलीप वसावे, प्रकल्प अधिकारी आणि सर्व समतादुत यांनी परिश्रम घेतले.  या कार्यशाळेला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांतधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here