सातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे.
मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी (दि.९) पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. अलीकडच्या काही वर्षात या शेती करण्याच्या बदल होत गेले. पारंपरिक शेतीला आता तंत्रज्ञानाची जोड दिली गेली.हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. मातीविना शेती हा प्रयोगही येथे राबविण्यात आला. तालुक्यातील दोन हजाराहून अधिक शेतकरी आज स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. भारतात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८५ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यात घेतले जाते.
शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या टुमदार फळांनी महाबळेश्वरला “स्ट्रॉबेरी लँड” अशी भौगोलिक ओळखही मिळवून दिली आहे. या स्ट्रॉबेरीची जागतिक स्तरावर असलेली लोकप्रियता आणि महत्त्व लक्षात घेऊन टपाल विभागाकडून स्ट्रॉबेरीचा विशेष सन्मान करण्यात आला.
मुंबई टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या सोहळ्यात स्ट्रॉबेरीचे छायाचित्र असलेल्या विशेष टपाल कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आले.
या सोहळ्याला डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल, महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आदी उपस्थित होते.पुणे पोस्टल विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये, प्रवर डाक अधीक्षक विलास घुले यांनी महाबळेश्वर येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्यांनी महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर प्रकाश टाकून पोस्ट विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळेल : कौल
• महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा स्वाद आणि त्याचे व्यावसायिक महत्त्व देश-विदेशात प्रसिध्द आहे.
• स्ट्रॉबेरी उत्पादनाने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली असून, ही स्ट्रॉबेरी टपाल कॅन्सलेशनवर झळकल्याने तिचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
• या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल यांनी व्यक्त केला.