प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार ३० हजार रु.
मुंबई : आजारपणामुळे खंगलेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीसाठी खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर धावून आले आहेत. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनच्यावतीने कांबळीला मदत केली जाणार आहे.
गावस्कर यांची ही संस्था कांबळीला प्रत्येक महिन्याला 30000 रुपये देणार आहे. विशेष म्हणजे कांबळीला आयुष्यभर ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्याला घर खर्चासाठी दिली जाणार आहे. तसेच त्याचा वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखी 30000 रुपये दिले जाणार आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कमही आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे. म्हणजे कांबळीला आयुष्यभरासाठी ही मोठी मदत होणार आहे. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनची सुरुवात 1999मध्ये झाली होती. गरजवंत क्रिकेटपटूंना मदत करणे हा या फाऊंडेशनचा हेतू होता.
विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासूनच ते दिले जाणार आहेत. म्हणजे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही रक्कम दिली जाणार आहे. 53 वर्षीय विनोद कांबळी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्य्तं त्याला हे पैसे देण्यात येणार आहेत. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
जानेवारीत भेट, एप्रिलमध्ये मदत
11 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. यावेळी कांबळीने गावस्कर यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं होतं. त्यावेळी कांबळी अत्यंत भावूक झाला होता. त्या भेटीनंतर आता गावस्कर यांच्या संस्थेने हा मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकृती ढासळल्याने निर्णय
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला यूरिन इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कांबळीची तब्येत बिघडल्याचं ऐकल्यानंतर गावस्कर यांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वानखेडे स्टेडियमवर दोघांचीही भेट झाली होती. त्यानंतर गावस्कर यांनी कांबळीच्या दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला मदत करण्याचा गावस्कर यांनी निर्णय घेतला.
मदत मिळणारा कांबळी दुसरा
सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनकडून खेळाडूंना मदत केली जाते. आता या फाऊंडेशनकडून मदत घेणारा कांबळी हा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना गावस्कर यांच्या फाऊंडेशनने मदत केली होती.