पुणे : देशासह राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला आहे. गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असं आयएमडीनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास एवढा असू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय 15 आणि 16 एप्रिलला ओडिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तर गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात बिहार आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी प्रतितास 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशभरात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे, या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.