अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांचे पालकत्व असलेल्या हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी ता. १९ एका दुचाकीस्वारावर छापा टाकून १० हजाराचा गुटखा पकडला. प्रशासनाची ही कारवाई म्हणजे डोंगरपोखरून उंदिर काढल्या सारखी असल्याचे बोलल
.
हिंगोली जिल्हा निर्मितीला २६ वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय परभणी येथूनच चालते. हिंगोलीत कार्यालयच नसल्यामुळे भेसळखोरांना आवर घालणे कठीण होते. त्यातच अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्याची खबर सर्व जिल्हयातील भेसळखोरांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हिंगोलीच्या नावाखाली असलेले कार्यालय असून अडचण अन नसून खोळंबा झाल्याची स्थिती पहावयास मिळते आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सण, उत्सवाच्या काळात धान्यादी व खाद्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न या कार्यालयाकडून केले जात नसल्याचे चित्र आहे. तर काही अधिकारी दर महिन्याला ‘ठराविक’ दिवशीच हिंगोलीत येऊन त्यांचे ‘काम’ करून जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे.
जिल्हाभरात गुटखा विक्री जोरात सुरु असतांनाही त्याकडे या कार्यालयाचे दुर्लक्षच असून अनेक वेळा गुटखा पकडण्याची कामगिरी पोलिसांनाच करावी लागत आहे. जिल्हाभरात पोलिस प्रशासनाकडून लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. मात्र अन्न व औषध प्रशासनाने मात्र मागील तीन ते चार महिन्यात गुटखा पकडण्याची पहिलीच कारवाई केली आहे.
दरम्यान, हिंगोली शहरात शनिवारी ता. १९ दाखल झालेल्या पथकाने जवळा पळशी रोड भागात एका दुचाकी चालकावर छापा टाकला. त्याच्याकडून जाफरानी जर्दाच्या वीस पुड्या, केसर युक्त विमलच्या २० पुड्या, विमल पान बिग पॅक असलेल्या ११ पुड्या असा १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी नितीन पवार याच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र प्रशासनाची हि कारवाई म्हणजे डोंगर पोखरून उंदिर काढल्या सारखी असल्याचे बोलले जात असून आता कार्यालय हिंगोलीत कधी स्थापन होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.