अजिंठा लेण्यांचा शोध लागलेल्या जगप्रसिद्ध व्ह्यू पॉइंटकडे जाणाऱ्या बाळापूर-पिंपळदरी मार्गावर दिशादर्शक फलकांची कमतरता पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाळापूर गावातून व्ह्यू पॉइंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावाचे नाव व अंतर दाखवणारे फलक तुटलेले आहेत.
.
बाळापूर-पिंपळदरी-व्ह ्यू पॉइंट हा मुख्य मार्ग आहे. मात्र या मार्गावर कोणत्याही गावाचे फलक नाहीत. त्यामुळे पर्यटक चुकीच्या दिशेने जातात. त्यांची तारांबळ उडते. दरवर्षी हजारो पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी येतात. लेणी पाहिल्यानंतर काही पर्यटक व्ह्यू पॉइंटकडे वळतात. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून ७६ मीटर उंचीवर असलेल्या घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरल्या आहेत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन याने दहाव्या गुहेच्या कमानीचा कोरीव भाग पाहून या लेण्यांचा शोध लावला होता. व्ह्यू पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी फलक आहेत. मात्र त्यावर गावाचे नाव नाही. बाळापूर घाटातील काही वळणांवर फलक गायब आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दिशा, अंतर आणि गावाचे नाव समजत नाही. दिशादर्शक फलक नसल्यामुळे पर्यटक भरकटतात. काही जण मुकपाट मार्गे अजिंठ्याला जातात. त्यामुळे व्ह्यू पॉइंटकडे जाणाऱ्या पर्यटकांना योग्य दिशा समजत नाही. स्थानिकांची मदत घ्यावी लागते.
पर्यटकांकडून होतेय मागणी
या मार्गावर नव्याने सूचनाफलक लावावेत, अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याची टीका होत आहे. तरी महामार्गावर लवकरात लवकर फलक लावावेत.