Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या सगळ्यात सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये उर्वशी बोलताना दिसते की, उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ मंदिराजवळ तिच्या नावाचं एक मंदिर आहे. हे ऐकून लोकांनी तिला लगेच ट्रोल करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर काही लोकांनी तिच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीसुद्धा केली.
उर्वशीनं सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की ‘उत्तराखंडमध्ये माझ्या नावावर एक मंदिर आहे. जर तुम्ही बद्रीनाथला गेलात, तर जवळच उर्वशी मंदिर आहे.’ त्यावर उर्वशीला सिद्धार्थ कनन म्हणाला, ‘लोक मंदिरात जातात आणि तुझा आशीर्वाद घेतात का?’ त्यावर उत्तर देत हसत हसत उर्वशी म्हणाली, ‘आता मंदिर आहे, तर तेच करतील ना.’
उर्वशीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत उर्वशी म्हणाली, मीडियाने तिच्या बोलण्याचा अर्थच बदलून दाखवला आहे. तिच्या टीमनं या सगळ्या प्रकरणात एक स्टेटमेंट जारी करत सांगितलं की “उर्वशी रौतेलाने फक्त एवढंच म्हटलं होतं की तिच्या नावावर उत्तराखंडमध्ये मंदिर आहे. असं नाही म्हटलं की ‘उर्वशी रौतेलाचं’ मंदिर आहे. पण लोक नीट ऐकतच नाहीत. ‘उर्वशी’ आणि ‘मंदिर’ एवढंच ऐकून लगेच समजून घेतलं की लोक उर्वशी रौतेलाची पूजा करतात. आधी व्हिडीओ नीट ऐका, मग बोला.”
हेही वाचा : रेखा यांची बहीण राधाला पाहिलंत का? ऋषि कपूर यांच्या चित्रपटाला नकार ते मॉडेलिंग… जाणून घ्या कोण आहे ‘ती’?
पुढे हेही सांगितलं आहे की कुठल्याही व्यक्तीवर आरोप करण्याआधी मीडियाने किंवा कोणालाही आधी फॅक्ट्स नीट तपासले पाहिजेत. याविषयी त्यांनी म्हटलं आहे की, ‘समाजात प्रत्येकानं एकमेकांशी आदरानं आणि एकमेकांना समजून घेऊन वागणं गरजेचं आहे. याचा अर्थ सगळ्यांचे हक्क जपले जातील.’