मराठी बोलण्यावरुन, खाद्यपदार्थांवरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणांहून गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत नसल्यामुळे अनेक वाद झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे. महाराष्ट्रात राहत असल्यावर तेथील मराठी भाषा ही यायलाच हवी असा आग्रह धरला जात आहे. तसे न झाल्यास अगदी मारहाण झाल्याचाही प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकरणावर शिव ठाकरेने आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाला शिव?
आयएएनएसशी झालेल्या मुलाखतीत, शिव ठाकरेने मनसे कार्यकर्त्यांनी लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडल्याच्या अलिकडच्या घटनांबद्दल आपले विचार मांडले आहे. शिवने सांगितले की, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, तुम्ही एखाद्याला मारहाण करून किंवा शिवीगाळ करून एखादी भाषा बोलण्यास भाग पाडू शकत नाही. तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणची भाषा शिकून तुमचा उदरनिर्वाह करण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. मी परदेशात गेलो तरी मला गुगलच्या मदतीने त्यांच्या भाषेत गोष्टींचे भाषांतर करावे लागेल. म्हणून, या गोष्टींबद्दल एक दृष्टिकोन असला पाहिजे.”
शिवचे मत आहे की, लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची असली तरी, हेतू योग्य आहे. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला मराठी येत असले पाहिजे यावर भर देत, तो पुढे म्हणाला की, जर तो इतर राज्यात गेला तर तो त्यांच्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो, किमान दोन ओळी तरी
शिवने पुढे मुलाखतीत सांगितलं की, “जर एखाद्याला तुमची भाषा येत नसेल तर त्याला मारणे योग्य नाही. मला वाटते की, जर मी गुजरात किंवा आसामसारख्या ठिकाणी गेलो तर मी त्यांच्या स्थानिक भाषेतील काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून स्थानिक लोकांना चांगले वाटेल.”
स्वतःचे उदाहरण देत म्हणाला की, “मी अलिकडेच बँकॉकला गेलो होतो, तसेच केपटाऊनला शूटिंगसाठी गेलो होतो, तिथे मी त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला वाटते की, ही पद्धत चुकीची असू शकते, परंतु मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असा निष्कर्ष त्यांने काढला.
अलीकडेच, मराठीत न बोलल्यामुळे लोकांवर शारीरिक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत मोठ्या प्रमाणात भाषेचा वाद निर्माण झाला आहे.