हिंगोली जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून गावपातळीवर विवाह ठरलेल्या वधु वरांच्या वयाची पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. त्याशिवाय प्रत्येक यंत्रणां
.
राज्यात अक्षय्य तृतीया हा मुहुर्त विवाह सोहळ्यासाठी सर्वात मोठा मुहुर्त मानला जातो. या दिवशी राज्यभरात मोठ्या संख्येने विवाह होता. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातूनही विवाह सोहळे होत असल्याचे याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी अल्पवयीन मुला, मुलींचे विवाह देखील होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाने मागील वर्षभरात सुमारे ३० पेक्षा अधिक बालविवाह थांबविले आहेत. यावेळी वधु वरांच्या आई, वडिलांसह कुटुंबियांना बालविवाहाचे दुष्परिणाम देखील समजावून सांगत त्यांच्या जागृती केली आहे.
दरम्यान, आता ता. ३० एप्रील रोजी अक्षय्य तृतीया आहे. या मुहुर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने आदेश काढले असून यामध्ये बालविकास सेवा योजना, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग व बालविकास विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या मध्ये प्रमुख्याने विवाह सोहळा ठरलेल्या वधु वरांच्या वयाची पडताळणी करण्याच्या सूचना पंचायत विभागाला दिल्या असून ग्रामसेवक व ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शिवाय अंगणवाडी सेविकांनी ग्राम, वार्ड बाल संरक्षण समित्यांच्या बैैठका आयोजित कराव्यात, पंचायत विभागाच्या ग्रामसेवक व ग्राम बाल संरक्षण समितीने गावात दवंडी देऊन बालविवाह होणार नाही याबाबत जनजागृती करावी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांनी गावातील किशोरवयीन मुलींची बैठक घेेऊन बालविवाहाबाबत चर्चात्मक संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिस विभागाने शहरी व ग्रामीण भागात बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. बालविवाह रोखण्याबाबत दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे.