४ मार्च रोजी मला पहिला व्हिडिओ कॉल आला. तेव्हापासून १७ एप्रिलपर्यंत त्या लोकांनी मला डिजिटल अरेस्ट केले. १ महिना १३ दिवस २४ तास माझा फोन सुरू होता. ५ मिनिटेही फोन बंद झाला तर ते लगेच फोन करायचे. पतींचे कोरोनात निधन झाले. घरात कुणीही पुरुष नाही. मी आण
.
डिजिटल अरेस्टचे धक्कादायक प्रकरण घडल्यानंतर लीना यांची ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने भेट घेतली आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. घडलेल्या प्रकारामुळे सुन्न झालेल्या लीना यांनी सांगितले की, पहिला कॉल ४ मार्च रोजी मला आला होता. कॅनरा बँकेतील तुमच्या अकाउंटवरून पैसे ड्रग्ज रॅकेटमध्ये वळवल्याचे सांगितले. मी अधिक चौकशी केली तेव्हा, अशा १५० लोकांची प्रकरणे असल्याचे भामट्यांनी सांगितले. व्हिडिओतील व्यक्तींनी पोलिस स्टेशनचा हुबेहूब सीन उभा केला होता. शिवाय ते अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. या प्रकरणातून मला ते बाहेर काढतील, अशा तऱ्हेने ते बोलत होते. घरात मी आणि आईच असते कळल्यावर आईच्या तब्येतीचीही विचारपूस करायचे. शिवाय दिलेल्या प्रत्येक रुपयाची रिझर्व्ह बँकेची पावतीही ते देत असल्याने माझा विश्वास बसला.
…अन् २४ तास फोन सुरू होता…
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल करत ते सतत २४ तास फोन सुरू ठेवत होते. मी कुणालाही बोलले तर रॅकेटमधील लोक जिवावर उठतील असा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे मी कुणाशीही या प्रकरणाची वाच्यता केली नाही. मध्यरात्री जर कॉल कट झाला तर ते पुन्हा कॉल करून फोन सुरू ठेवण्यास सांगायचे. माझ्या सुरक्षेसाठी कॉल सुरू ठेवणे गरजेचे आहे, असा विश्वास त्यांनी दिला होता.
आता पुढे कसे जगायचे असा प्रश्न पडला
पतीच्या निधनानंतर संपूर्ण आयुष्याची जमापुंजी गेली आहे. आईच्या औषधांसाठीही पैसे नाहीत. पुढील जीवन कसे जगायचे हा प्रश्न पडला आहे. वृत्त प्रकाशित होताच प्रत्येक जण चौकशीसाठी येत आहे. मी कशी चुकले यावरच प्रत्येक जण चर्चा करत असल्याची सद्य:स्थिती आहे.
आता कुणावर विश्वास ठेवणे अवघड झालेय…
डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेकडील आयुष्यभरात जमवलेल्या जमापुंजीवर आरोपींनी गंडा घातला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने लीना नांदापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘तुम्ही खरोखर दिव्य मराठी’तूनच बोलताय ना?’ असे विचारले. तर आता पोलिसांवरही विश्वास ठेवणे अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच या घटनेचा त्यांच्यावर खूप परिणाम झाल्याचे दिसून आले, परंतु त्या धीराने या घटनेला सामाेरे जात आहेत.