Shah Rukh Khan Kashmir Connection: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये काश्मीरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शाहरुखने या मुलाखतीमध्ये आपण कधीच काश्मीरला का गेलो नाही याबद्दलची एक भावनिक आठवण सांगितलेली. खास करुन पहलगाम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तो का गेला नव्हता याबद्दल त्याने भाष्य केलं. विशेष म्हणजे त्याने हे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून सांगितलं होतं.
शाहरुख अनेक देश फिरला पण…
खरं तर शाहरुखने जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. अगदी इस्तांबूलपासून ते इटलीपर्यंत आणि अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक देश शाहरुख फिरला आहे. मात्र 2012 मध्ये तो पहिल्यांदा काश्मीरमध्ये गेला होता. मात्र आई-वडील काश्मिरी असूनही शाहरुख या भागात का गेला नव्हता याबद्दलची माहिती त्यानेच थेट बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बोलताना भावनिक होत दिली होती.
माझे आई-वडील काश्मिरी होते
‘कौन बनेगा कोडपती’ या रिअॅलिटी शोच्या एका विशेष भागामध्ये शाहरुख खान सहभागी झाला होता. कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर शाहरुख ‘जब तक है जान’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हॉट सीटवर बसलेला. शाहरुखने त्याचे आई वडील काश्मिरी असूनही तो कधी काश्मीरला का गेला नाही याबद्दल एक भावनिक आठवण सांगितलेली. शाहरुख अवघ्या 15 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र त्यापूर्वी त्यांनी काश्मीर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. “माझे आई वडील काश्मिरी होते,” असं शाहरुखने अमिताभ यांना सांगितलं.
मला असं वाटत होतं की…
“एकदा त्यांनी मला बोलता बोलता आयुष्यात कोणकोणती ठिकाणं आयुष्यात मी एकदा तरी पाहिली पाहिजेत याबद्दल सांगितलं होतं. तीन जागा मी पहाव्यात असं त्यांना वाटत होतं. इस्तांबूल, इटली आणि काश्मीर! मी यापैकी पहिल्या तीन जागा ते नसताना पाहिल्या आहेत. मात्र ते माझ्यासोबत नसताना मी काश्मीर पाहू नये असं मला वाटतं,” असं शाहरुखने सांगितलं.
अनेकदा संधी चालून आली पण…
एवढ्यावरच न थांबता शाहरुखने अनेकदा काश्मीर पाहण्याचा योग चालून आलेला अशी आठवणही सांगितली. “खूप साऱ्या संधी आल्या होत्या. अनेक मित्रांनी मला फोन करुन बोलावलं. माझं कुटुंब सुट्ट्यांसाठी तिथे गेलेले. मात्र मी कधीच काश्मीरला गेला नाही. यामागे एकच कारण होतं ते म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, तुला काश्मीर मी दाखवेन!” असं भावूक झालेल्या शाहरुखने सांगितलं.
…अखेर शाहरुख काश्मीरला गेला
त्यामुळेच शाहरुख वडिलांच्या निधनानंतर जेव्हा काश्मीरला गेला तेव्हा तो त्याच्यासाठी वडिलांसारखे असलेल्या यश चोप्रा यांच्या सांगण्यावरुनच गेला. ‘जब तक है जान’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख काश्मीरला जाऊन आला. काश्मीरला जाऊन आल्यानंतर त्याने ट्वीटवरुन एक पोस्ट केली होती, “माझ्या वडिलांची एक अपूर्ण राहिलेली इच्छा होती की मला काश्मीरला घेऊन यावं… आज मी इथं (काश्मीरमध्ये) आहे. असं वाटतंय की मी त्यांच्या मिठीत विसावलोय,” असं शाहरुख या पोस्टमध्ये म्हणाला होता.
एप्रिल 2023 मध्येही शाहरुख काश्मीरला गेलेला
यापूर्वी शाहरुखने ‘दिल से’ चित्रपटानिमित्त लडाखमध्ये शुटींग केलं होतं. 1990 च्या दशकामध्ये हे शुटींग केल्यानंतर तो काश्मीरला कधीच गेला नव्हता. आता मध्यंतरी तो एप्रिल 2023 मध्ये राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शुटींगनिमित्त काश्मीरला जाऊन आला. त्याने तापसी पन्नूसोबत सोनमर्गमध्ये या चित्रपटातील काही दृष्य शूट केली होती.