पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे, देशावरील संकट निवारण्यासाठी गणपती बाप्पाला साकडे घातले असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर म्हटले आहे.
.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरून गेला आहे. तिथे जसा हल्ला झाला तसेच प्रत्युत्तर आम्ही या हल्लात सहभागी असणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांना देणार आहोत. यासाठी आम्हाला गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांना जसेच्या तसे उत्तर देणार
जे.पी. नड्डा म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कठोर पावले उचलली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना जसेच्या तसे उत्तर दिले जाईल. यासाठी गणपती बाप्पाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद द्यावी अशी मागणी करण्यासाठीच मी पुण्यात आलो आहे. देश मजबुतीने पुढे जाऊन या संकटातून बाहेर पडेल.
नड्डांनी घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मंदिरात अभिषेक देखील केला. जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद नष्ट व्हावा, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे. पी. नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यात ग्राम विकास विभाग आणि राज्य पंचायत राज विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला ते उपस्थित राहणार आहेत.