पुण्यातील खराडी-मुंढवा रस्त्यावरील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश खराडी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या कारवाईत थायलंडमधील तीन तरुणींसह सहा जणींची सुटका केली.
.
स्पा सेंटरचा व्यवस्थापक लेनखौके किपगेन (30, मणिपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. मालक विकास किशोर ढाले (30, अमरावती) याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून प्रथम खातर जमा केली. त्यानंतर छापा टाकण्यात आला. व्यवस्थापक आणि मालकाने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघड झाले. सुटका करण्यात आलेल्या सर्व तरुणींना न्यायालयाच्या आदेशाने सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिसउपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी शहरात 33 मसाज सेंटरवर कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सराइताकडून पिस्तुलासह काडतूस जप्त
बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. सराइताकडून पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले.मौला उर्फ मौलान रसूल शेख (वय 22, कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख सराइत गुन्हेगार असून, तो कोंढव्यातील लक्ष्मीनगर आणि अश्रफनगर भागात वास्तव्यास आहे. शेख याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील सहायक पोलिसफौजदार राजस शेख आणि पृथ्वीराज पांडुळे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोंढवा परिसरात सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.