हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी ता 26 दिल्या आहेत.
.
हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गांगलवाडी शिवारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे सिद्धेश्वर धरणावरून हिंगोली शहर पाणी आणणे कठीण झाले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी किमान तीन ते चार दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पालिकेने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पुढील चार दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान गांगालवाडी शिवारात ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली त्या ठिकाणी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पाहून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.
सध्या उन्हाळ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. पालिकेने चार दिवसाचा कालावधी दिला असला तरी त्यापूर्वीच दुरुस्तीचे काम सुरू करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी यंत्रणा व साहित्य तातडीने उपलब्ध करून घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या. उन्हाळ्यामध्ये शहराला सुरळीतपणे व योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल याकडे पालिकेने कटाक्षाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर यंत्रणांकडून रस्ते, पुल बांधणीसाठी खोदकाम काम सुरू असताना पालिकेने त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करून खोदकाम करणारे यंत्रणांना जलवाहिनीची माहिती द्यावी. त्यामुळे जलवाहिनी फुटणार नाही तसेच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहील व पालिकेलाही दुरुस्तीचा खर्च करावा लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर शहरातील सर्व प्रभागांमध्ये शक्य तितक्या लवकर योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुप्त यांनी दिल्या