पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कुणी अवैधरीत्या राहत असेल, तर त्यांचाही शोध घेतला जाईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यामध्ये पहलगाम अतिरेकी हल्ल
.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे लोक व्हिसा घेऊन येथे आलेले आहेत, त्यांची सगळी माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटली असून त्यांना नोटीसही देण्यात आली आहे. तसेच त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. सगळे परत जात आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कुणी अवैधरित्या आले असेल, तर त्यांनाही शोधण्याची प्रक्रिया आपली चालू असते. ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात, त्याप्रमाणात अवैध पाकिस्तानी सापडत नाहीत. त्यामुळे आता पहिला जोर जे लोक व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्या सगळ्यांना 48 तासांत बाहेर काढायचे आहे. त्यावर पोलिस योग्यरीत्या काम करत आहेत.
देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात
पाकिस्तानातील काही नागरिक हे वैद्यकीय उपचारासाठी राज्यात आले आहेत. त्यांनी राज्याकडे विनवणी केली आहे. याबाबत विचारले असता, यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, तर केंद्र सरकारचा आहे. इथे आपण ज्याप्रकारे सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले, तसेच पाकिस्तानात देखील तेच केले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून कोणाबद्दल आपली सद्भावना असतेच, पण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा विषय येतो, त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात. पाकिस्तानच्या सरकारला हे समजले पाहिजे की, त्यांची निर्भरता भारतावर आहे. ज्याप्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एकप्रकारे ते खून करतात, आज जगातील कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही. ही पाकिस्तानची परिस्थिती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
खायला पैसे नाहीत अन् न्यूक्लिअर बॉम्बचं सांगत आहेत
पाकिस्तानच्या मंत्र्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब असल्याची उघडपणे धमकी दिली आहे, याबाबत फडणवीसांना विचारले असता, त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत, न्यूक्लिअर बॉम्बचं काय सांगतात. त्यांच्याकडे लोक भुकेने मरत आहेत. अशी त्यांची अवस्था आहे आणि न्यूक्लिअर बॉम्ब सांगत आहेत, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.
राजकारणात भूमिका बदलत असतात
देवेंद्र फडणवीस हे 2034 सालापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. याबाबत फडणवीसांना विचारले असता, बावनकुळे यांच्या हातात असले तर ते आगामी 100 वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील. पण त्यांच्या शुभेच्छांचा आपण मतीतार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच मला या शुभेच्छा दिल्या आहेत, असे ते म्हणाले. बाकी राजकारणात भूमिका बदलत असतात. या भूमिका बदललल्याही पाहिजेत. कोणीही फार दीर्घकाळ कोणत्याही पदावर राहात नाही. त्यामुळे माझी भूमिका जेव्हा बदलायची तेव्हा बदलेल, असे सांगत भविष्यात माझी भूमिका बदलू शकते अन्यथा काहीही होऊ शकते असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.
एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना समज द्यावी
संजय गायकवाड यांनी पोलिस खात्याशी संबंधित वक्तव्य केले होते. पोलिसांसाठी त्यांनी शिवी वापरली होती. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही. मी स्वतः शिंदेना साहेबांना सांगणार आहे की, संजय गायकवाडांना कडक समज द्या. हे असे चालणार नाही. हे योग्य नाही. संजय गायकवाड वारंवार असे बोलत असतील, तर त्यांच्यावर योग्य ती अॅक्शन घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.